मुंबई,: आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर बाळासाहेबांच्या शिवसेनेने टोले लगावले. भाजपने आदित्य ठाकरे यांना थेट ठाण्यातून लढा, असं प्रतीआव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवीन चॅलेंज दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना राजीनामा देऊन ठाण्यातून लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. आता एकनाथ शिंदे हे आव्हान स्वीकारतात का यावरून आणखी काही राजकारण रंगतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘गद्दार गटातल्या केंद्रीय नेत्यांपासून ते गल्लीतल्या लोकांपर्यंत मला शिव्या द्यायला लागले. मला इकडून उभे राहा, तिकडून उभे राहा, असं चॅलेंज द्यायला लागले, पण मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, याचा अर्थ ते माझ्या चॅलेंजला घाबरले आहेत,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
‘त्यांनी एवढं सगळं करण्यापेक्षा, आयटी सेल चालवण्यापेक्षा तुम्ही मला फोन करून सांगितलं असतं, आदित्य तू मला जे चॅलेंज दिलं आहे ते मला परवडणारं नाही. मला जमत नाही, मी वरळीतून लढू शकत नाही, तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज देतो. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, आमदारकीचा राजीनामा द्या. ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो. तिकडे होऊन जाऊ दे एकदा,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
याआधी रविवारीही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं. ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एका आमदाराने चॅलेंज दिल्यावर काहीजण असे हडबडलेत की, अख्खा गद्दार गट, त्यांच्या मित्रपक्षातले नेते आणि ‘आयटी सेल्स’ लगेच मला शिव्या देऊ लागले आहेत’, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं.
‘हास्यास्पद आहे की ज्यांची नोंद ३३ देशांनी घेतली ते स्वतः उत्तर देऊ शकत नाहीत, ना वेदांता वर, ना बल्क ड्रग पार्क वर, ना दाव्होसच्या ₹४०कोटींच्या खर्चावर! दुर्देव आहे की हाच राग आणि आवाज महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांविरुद्ध कधी दिसला नाही. महाराष्ट्राचा अपमान होताना, महाराष्ट्राची लूट होताना लपलेले असतात,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.