मॅरेथॉन स्पर्धा आगामी काळात लातूरचा लौकीक वाढवणारी ठरेल-माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : -इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर आणि ऑफिसर्स_क्लब लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे आयोजित हाफ मॅरेथॉनचे बक्षीस वितरण राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख हस्ते करण्यात आले, लातूरकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी लाभदायी ठरणारी ही मॅरेथॉन स्पर्धा आगामी काळात आणखी भव्य स्वरूप धारण करून लातूरचा लौकीक वाढवणारी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लातूर शहरातील ऑफिसर्स क्लब येथे रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी लातूर आयएमएच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेच बक्षीस वितरण माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, औरंगाबाद विभागाचे सेल्स टॅक्स कमिशनर तथा लातूरचे माजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकुंद भिसे, लातूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, डॉ. रमेश भराटे, प्रा. शिवराज मोटेगावकर, उद्योजक तुकाराम पाटील, उद्योजक धर्मवीर भारती, डॉ. अजय जाधव, डॉ. सुधीर फत्तेपूरकर, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिज झंवर, डॉ. आरती झंवर, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ. कांचन जाधव, डॉ. शुभांगी राऊत आदीसह लातूर आयएमएचे पदाधिकारी सदस्य महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले की, लातूर शहरात लातूर आयएमएद्वारा सर्वांच्या सहकार्याने आयएमए हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा घेण्यात आली. ही अभिनव स्पर्धा घेतल्या बद्दल त्यांनी सर्वांचे कौतु केले. ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडत असतांना सर्वांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे. अत्यंत चांगले आयोजन करून लातूरचा नावलौकीक वाढवण्याचे काम या स्पर्धेतून होत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, व्यक्तीसाठी स्वास्थ्य नीट राखण्याची अशा स्पर्धाची आवश्यकता आहे, आपण लातूरकर म्हणून आज येथे एकत्रित आलो आहोत. लातूरसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून लातूर ऑफीसर्स क्लब साकार झाला, हा क्लब नावारूपाला येत आहे. सध्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी हेही या क्लबच्या माध्यमातून चांगले काम करत आहेत. लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. आयोजनामध्ये प्रायोजक म्हणून आर्थिक मदत केली, लातूरकरांच्या चांगल्या कामासाठी नेहमी अशीच मदत करावी असेही आवाहन यावेळी आमदार देशमुख यांनी केले. शेवटी लातूरकरांनी व राज्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्यांचे कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लातूर ऑफिसर्स क्लबची जिम, स्नोकर, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस हॉल, बॅडमिंटन हॉल, मल्टीपर्पज हॉल आदी सोयीसुविधांची पाहणी करून लातूरकरांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा उभारल्याबद्दल त्यांनी लातूर जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.