पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. २००१ ते २००८ या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले होते. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते. दुबईमधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले असल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने समोर येत आहे. गेले अनेक दिवस दुबईमधील रुग्णालयात ते उपचार घेत होते.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते. आपले आत्मचरित्र “इन द लाइन ऑफ फायर” यामध्ये त्यांनी या युद्धाबाबत लिहिले की, पाकिस्तानी सैन्य युद्धात सहभागी होते, मात्र हे सत्य आम्ही लपवले. या युद्धातील पराभवाचे खापर मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर फोडले होते
तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरुन हटविले होते. त्यांच्याजागी जनरल अजीज यांना लष्कर प्रमुख बनविण्यात आले. मात्र जनरल अजीज हे परवेज मुशर्रफ यांचे विश्वासू सहकारी आहेत, याची नवाज शरीफ यांना कल्पना नव्हती. अखेर परवेज मुशर्रफ यांनी लष्कराच्या बळावर सत्ता काबिज करुन नवाज शरीफ यांना सत्तेबाहेर काढले.
परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ साली दिल्ली येथे झाला होता. १९४७ साली फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब दिल्लीहून कराची येथे स्थायिक झाले होते. १९७४ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले होते. त्यांनी २००१ ते २००८ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.