• Wed. Apr 30th, 2025

बांधकाम क्षेत्रात नवीन कल्पना उपयुक्त – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर 

Byjantaadmin

Feb 4, 2023
बांधकाम क्षेत्रात नवीन कल्पना उपयुक्त
– शिवराज पाटील चाकूरकर
     लातूर/प्रतिनिधी:आज लोकांचे राहणीमान बदलत असून बांधकाम तंत्रात बदल होत आहे.
या क्षेत्रात नवीन कल्पना अतिशय उपयुक्त ठरत असून त्याची माहिती देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लातूर बिल्ड एक्स्पो हा दूरदृष्टीचा उपक्रम असल्याचे मत देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.
     रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजित लातूर बिल्ड एक्स्पो २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी चाकूरकर बोलत होते.व्यासपीठावर कालिका स्टीलचे कार्यकारी संचालक अनिल गोयल,रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे नियोजित प्रांतपाल  सुरेश साबू,असिस्टंट गव्हर्नर नंदकिशोर लोया यांच्यासह रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष वीरेंद्र फुंडीपल्ले,सचिव अमोल दाडगे,प्रकल्प प्रमुख रवी जोशी,पूर्व अध्यक्ष अनुप देवणीकर,श्रीनिवास भंडे यांची उपस्थिती होती.
    यावेळी मार्गदर्शन करताना चाकूरकर म्हणाले की,बांधकाम क्षेत्रात नवे प्रयोग झाले तर बांधकाम करणाऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो.चांगले घर बांधण्यासाठी चांगल्या साहित्याची आवश्यकता असते. त्याची माहिती नागरिकांना आवश्यक आहे.काळानुसार बांधकामाची पद्धत बदलली आहे.पूर्वी मातीची घरे होती.नंतर सिमेंटची घरे आली.आता लोखंडी खांब वापरले जात आहेत.आज
आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे.ती वाढतच असून त्यासाठी अधिकाधिक घरांची मागणी कायम असणार आहे.त्यामुळे असे प्रयोग वारंवार झाले पाहिजेत,असेही चाकूरकर म्हणाले.
    कालिका स्टीलचे अनिल गोयल यांनी रोटरीमुळे आम्ही सर्व एकत्र आल्याचा आवर्जून उल्लेख केला.सुरेश साबू यांनी एक्सपोचा पहिला प्रयोग जालना येथे झालेला असल्याचे सांगितले.असे एक्स्पो ही काळाची गरज असून दरवर्षी त्याचे आयोजन केले जावे,असेही ते म्हणाले.असिस्टंट गव्हर्नर नंदकिशोर लोया यांनी रोटरीमार्फत समाजाला गरजेचे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष वीरेंद्र फुंडीपल्ले यांनी क्लबने नाविन्याचा ध्यास घेतलेला असल्याचे सांगून दरवर्षी नवे उपक्रम आणि आयोजित करतो अशी माहिती दिली.
   प्रारंभी रोटरीच्या वतीने वीरेंद्र पुंडीपल्ले,रवी जोशी,अनुप देवणीकर,अमोल दाडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रवी जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.संचलन डॉ. पुरुषोत्तम दरक तर आभार प्रदर्शन सचिव श्रीनिवास भंडे यांनी केले.
    या कार्यक्रमास रोटरीचे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी, सुनील कोचेटा,नीळकंठ स्वामी, जे.एम. कुलकर्णी,मोईन शेख यांच्यासह रोटरीच्या विविध शाखांचे अध्यक्ष,पदाधिकारी आणि सदस्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed