• Wed. Apr 30th, 2025

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार आज जाहीर करणार, ‘ही’ नावे चर्चेत

Byjantaadmin

Feb 4, 2023

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्र महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहेत यावर काल एकमत झाले आहे.  मविआच्या बैठकीनंतर आघाडीचे उमेदवार  देण्याबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आज महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर केले जाईल. तीनही घटक पक्षांनी काल संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठीही महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचाच उमेदवार असेल अशी चर्चा आहे.

दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेविका नीता परदेशी यांची नावं चर्चेत आहेत.

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी कोणाला देणार याची घोषणा पक्षातर्फे लवकरच केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केसरी वाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली. कसब्यामधून भाजप कोणाला उमेदवारी देणार याबद्दल उत्सुकता आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल असं बोललं जातंय. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने पाच संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय समितीकडे पाठवली आहे. त्यात शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed