• Tue. Apr 29th, 2025

निवडणूक जिंकली, आता पुढे काय? सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, येत्या ४ तारखेला…

Byjantaadmin

Feb 3, 2023

राज्यात शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी आता थंडावली असून भाजपाला पाचपैकी फक्त एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. मात्र, त्याहून जास्त चर्चा होतेय ती सत्यजीत तांबे यांच्या विजयाची. नाशिक पदवीधर मतदारसंघात मविआच्या अधिकृत उमेदवाक शुभांगी पाटील यांना पराभूत करून सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता नेमकी सत्यजीत तांबे पुढे काय भूमिका घेणार?याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

भाजपाची ऑफर, काँग्रेसचं आस्ते कदम!

सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीनंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याबाबत बरीच चर्चा रंगली होती. एकीकडे सत्यजीत तांबेंच्या भाजपा प्रवेशासाठी सकारात्मक असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील सत्यजीत तांबेंबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं विधान केल्यामुळे तांबेंच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत?

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसमध्ये चाललेल्या दावे-प्रतिदाव्यांमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नसल्याची भूमिका मांडली आहे. “सत्यजीत तांबेंनी विधानपरिषद निवडणूकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. ते अपक्ष म्हणून जर विधानपरिषदेत जाणार असतील, तर त्यानंतर त्यांना पक्ष बदलता येणार नाही. ते इतर पक्षांना पाठिंबा देऊ शकतात”, असं दीपक केसरकर म्हणाले.

विजयानंतर सत्यजीत तांबे म्हणाले…

प्रचंड राजकीय उत्सुकतेच्या ठरलेल्या या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतं आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात”, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मनं जिंकण्याचं काम केलं. हाच ऋणानुबंध पुढे नेण्याचं काम मी करेन. सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत मी ४ तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन”, असं यावेळी तांबेंनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed