सहकार व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन
श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांचा ‘लोकमत सखी’चा वुमन ऑफ इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मान
लातूर (प्रतिनिधी) : कृषी सहकार आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमत सखी डॉट कॉम यांच्या वतीने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांना आज वुमन ऑफ इम्पॅक्ट पुरस्काराने पुणे येथे जाहीर सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी वैशाली विलासराव देशमुख यांची उपस्थिती महिलांना प्रेरणा देणारी ठरली. हा पुरस्कार बुधवार (दि. 1 फेब्रुवारी) दै. लोकमतच्या भव्य कार्यक्रमात जे डब्ल्यू मेरीयट सभागृह, पुणे येथे लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन श्री.विजय दर्डा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास दिग्दर्शक नागराज मंजुळे, अमृता फडणवीस, ऋषी दर्डा, स्वप्निल शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोकमत सखी डॉट कॉमच्या वतीने विविध क्षेत्रात आपले वेगळेपण जपून कार्य करणाऱ्या महिलांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कारासाठी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी सहकारी संस्था माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी दिलेल योगदान सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी चेअरमन – विलास सहकारी साखर कारखाना ली., विश्वस्त – पुरोगामी विचाराचे दै.एकमत या पदावर काम केले आहे. श्रीमती वैशाली विलासराव देशमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री, लोकप्रिय लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या पत्नी आहेत. त्यांनी शेती, सहकार, साखर उद्योग, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, वृत्तपत्र आदी क्षेत्रात विविध संस्थाच्या माध्यमातून काम केले आहे.राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, सुप्रसिध्द सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या आई आहेत.
आपली मुल संस्कारी, उच्चशिक्षीत आणि कर्तबगार व्हावीत यासाठी प्रेम, वात्सल्य, जिव्हाळ्याने त्यांना शिस्तीचे त्यांनी धडे दिले. कुटूंबातील राजकीय वातावरण व सार्वजनिक जीवनातील व्यस्तता, धामधुमीचा काळ असताना मुलांना संस्कार, शिक्षण आणि करिअरसाठी उत्तम आदर्श गृहीणी म्हणून जबाबदारी पार पाडली. राजकीय परिवाराचा व सामाजिक कार्याचा वारसा आहे पण सोबत उच्च शैक्षणिक करिअरला देखील त्यांनी महत्व दिले. यामुळे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शिक्षण बीई केमिकल इंजिनीअर, सुप्रसिध्द सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख शिक्षण बॅचलर इन आर्कीटेक्चर व लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे शिक्षण बीई केमिकल एमबीए झाले आहेत. आज राज्यात आणि देशात तीनही मुलांचा राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रात नावलौकीक झाला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगाण हा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख या कतृव्यदक्ष गृहिणीचा सन्मान आहे. ग्रामीण आणि कृषी संस्कृतीमधील पंरपरा, सण-उत्सव हा खरा काळ्या मातीशी जोडणारा सेतू आहे, ही देशमुख परिवाराची विचारधारा आहे. या परिवाराचा भाग झाल्यापासून या संस्काराचे जतन आणि संवर्धन त्यांनी केले.
सहकार आणि साखर उद्योगात आधुनिक साखर कारखाना म्हणून पथदर्शी ठरलेल्या विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या त्या चेअरमन म्हणून कार्यरत राहिल्या. नंतर आधुनिक उसशेती, पशुपालन, दुग्धोत्पादनकडे लक्ष दिले. या कामातून त्यांनी शेतीकडे नकरात्मकदृष्टीने न पाहता शेतकरी आणि भावीपीढीने शेतीचे शास्त्र समजून शेती करावी यासाठी प्रेरणा दिली. विविध संस्थाच्या माध्यमातून काम करताना त्यांनी आधुनिक ऊसशेतीला चालना दिली, ऊसशेतीमध्ये काम करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले, काळाची गरज ओळखून सेंद्रिय ऊसशेतीला महत्व दिले. दुग्धोत्पादनासह कृषीपूरक व्यवसाय, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपन, महिलासाठी आरोग्य तपासणी शिबीर, कर्करोग तपासणी व निदान शिबीर, रक्तदान शिबीर, महिलाची आर्थिक साक्षरता वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी होणेसाठी प्रयत्न केला आहे. त्यांना शेती आणि ग्रामीण जीवनाची आवड आहे, त्या स्वतः शेतीमध्ये रममाण राहतात. शेती क्षेत्रात आज फार मोठे बदल झाले आहेत. त्यांनी ऊसशेती करीत असतांना शेतात पुर्वमशागत, ऊस लागवड, आंतरमशागत ते ऊसतोडणी पर्यंत यांत्रीकीकरणाचा वापर केला आहे.
आधुनिक शेती करीत असतांना पारंपारिक व अद्यावत तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधून ऊसाचे हेक्टरी ३२१.२१ मेट्रीक टन सर्वाधिक ऊस उत्पादन केल्याबद्दल त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ‘ऊस भूषण’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या सहकार, कृषी व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची लोकमत सखी काॅमने दखल घेऊन वुमन ऑफ इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.