• Tue. Apr 29th, 2025

विजयाचा गुलाल कोण उधळणार?:शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या मतमोजमीला सुरुवात; भाजप आणि मविआ आमने-सामने

Byjantaadmin

Feb 2, 2023

नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे.

सकाळी 8 वाजेपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम मतपेट्या उघडून बाद मते बाहेर काढली जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल.

पहिल्या पसंतीच्या मतावर उमेदवार विजयी झाल्यास संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निकाल लागू शकतो. मात्र, दुसऱ्या पसंतीवर निकाल लागल्यास रात्री निकालासाठी उशीर लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

  • औरंगाबादेत मतमोजणीला सुरवात झाली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने , मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , जिल्हा निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि उमेवारांचे प्रतिनिधी मतमोजमी केंद्रांवर उपस्थित आहेत. 56 टेबलांवर ही मतमोजणी होत आहे.
  • नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 48 पोस्टल मतं वैध ठरली आहेत. तर, 12 मतं अवैध ठरली आहेत.
  • कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजमीला सुरुवात झाली आहे. 98 मतपेट्या उघडल्या आहेत. वैध आणि अवैध मतांची चाळणी सध्या सुरू आहे.
  • अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे.
  • मतमोजणी दोन टप्प्यांत होणार आहे. दुपारपर्यंत अवैध मत व वैध मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल.
  • या लढतींकडे राज्याचे लक्ष
  • नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.

    औरंगाबादेत 14 उमेदवार रिंगणात

    औरंगाबादेत चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे मतमोजणी सुरू झाली आहे.
    औरंगाबादेत चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे मतमोजणी सुरू झाली आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केल्याने विक्रम काळे यांची डोकेदुखी वाढली. यानंतर सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. सोळुंके व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. औरंगाबाद मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत.

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत.
मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत

नाशिक : सत्यजित तांबे- शुभांगी पाटील यांच्यात चुरस

नाशिकमध्ये सत्यजित तांबे व भाजप बंडखोर शुभांगी पाटील यांच्यात खरी चुरस आहे. शुभांगी पाटील यांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड केले. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला असून भाजपने छुपा पाठिंबा दिला आहे, तर शुभांगी पाटील यांना ठाकरे गटासोबतच महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केल्याने सामना चुरशीचा होईल.

नागपूर : ना.गो. गाणार – आडबोले

नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे ना. गो. गाणार व विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर आडबोले यांच्यात चुरस आहे. ठाकरे गटाचे गंगाधर झाडे यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगण्यात आले होते. गंगाधार झाडे यांच्या माघारीमुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुधाकर आडबोले यांची अडचण होऊ शकते. नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण 22 जण रिंगणात आहेत.

अमरावती : भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी लढत

अमरावतीमध्ये भाजपचे डाॅ.रणजित पाटील, काँग्रेसचे धीरज लिंगाडे व वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकर यांच्यात तिरंगी लढत आहे. अकोला व अमरावतीमध्ये वर्चस्व असलेल्या वंचितच्या उमेदवारांनी मते खेचल्यास काँग्रेसला फटका बसू शकतो. इथे 23 उमदेवार आहेत.

कोकणात पाटील-म्हात्रे आमने-सामने

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे व मविआ पुरस्कृत अपक्ष उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्यात चुरस आहे. जदयूचे धनाजी पाटील यांच्यासह एकूण 8 उमेदवार रिंगणात आहेत. धनाजी पाटील यांची मते कुणाचे नुकसान करतात त्यावर निकाल अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.

ही बातमी अजून update होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed