• Tue. Apr 29th, 2025

महाराष्ट्र विद्यालय,निलंगा येथे नाविन्यपूर्ण रीतीने आनंद उत्सवात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Byjantaadmin

Jan 30, 2023

महाराष्ट्र विद्यालय,निलंगा येथे नाविन्यपूर्ण रीतीने आनंद उत्सवात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

निलंगा:-प्रति वर्षाप्रमाणे महाराष्ट्र विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री विजयजी शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना प्रथमतः स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन स्वागत केले. नंतर प्रमुख पाहुणे वर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून, अध्यक्षांच्या हस्ते तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर स्काऊट गाईडचे विशेष संचलन व झेंडा गीत घेऊन स्काऊटच्या झेंड्याचेही ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाचंगे आर.के., उप मुख्याध्यापक श्री पवार डी.डी., पर्यवेक्षक श्रीमती देशमुख एस.डी., सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर प्रभातफेरीला सुरुवात झाली. ज्यामध्ये तिरंगी फुलांनी व फुग्यांनी सजलेल्या ट्रॅक्टरमध्ये विविध समाज सुधारक, राजकीय नेते, क्रांतिकारक, इतिहासातील महान व्यक्ती, संत अशा विविध वेशभूषा करून जवळपास शाळेतील 500 विद्यार्थी सुंदर अशा पेहरावात उपस्थितांचे लक्ष वेधत होते. ढोल पथक व हलकीच्या तालावर लेझीम आणि टिपरीच्या पथकाने बहारदारपणे नृत्य सादर केले. इतर सर्व विद्यार्थ्यांनी तिरंग्यातील तीन रंगांच्या टोप्या परिधान करून सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण केले होते. तसेच विद्यार्थी विविध प्रबोधनात्मक व समाज जागृती करणारे संदेश फलका मार्फत सर्वांना देत होते. तसेच काही विद्यार्थी हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन सर्वांना अभिवादन करत होते.
अतिशय आकर्षक व विस्मयचकित वातावरणात ढोल ताशांच्या गजरामध्ये पूर्ण निलंगा शहरात विविध घोषणा देत देश भक्तीपर गीतांच्या निनादामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली.
प्रभात फेरीतील मनमोहकता व नाविन्यपूर्ण सौंदर्य पाहून शहरातील विविध स्तरातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे व शालेय प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.
या शोभायात्रेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी या निमित्ताने भाषणे व गीत गायन केले. नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed