सोलापूर: शरद पवार हे खरेच अजब रसायन आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळाले . कायम माणसात रमणारे पवार साहेब एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी थेट हेलिकॉप्टर घेऊन मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात पोहचलो आणि तेही सपत्नीक… मंगळवेढा तालुक्यातील लतिफ तांबोळी यांच्या मुलीचा विवाह मरावडे या ठिकाणी आयोजित केला होता . लतिफ हे पहिल्यापासून पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत . आपली कन्या हिना हिच्या विवाहाची पत्रिका काही दिवसापूर्वी लतिफ यांनी पवार यांना देऊन लग्नाला येण्याची विनंती केली होती.
लतिफ यांनी पवार यांचा कार्यक्रम पाहून शनिवारी विवाह मुहूर्त धरला होता. मुस्लिम समाजात शुक्रवार अर्थात जुम्मा आणि अकराची वेळ शुभ मानतात. मात्र आपल्या साहेंबाना शनिवारी दुपारी तीन वाजता वेळ आहे हे पाहून रूढी परंपरा मोडत शनिवारी दुपारी तीन वाजता विवाह ठेवला. समाज बांधव , ग्रामस्थ यांनी यामुळे लतिफ भाई यांची टिंगल देखील केली . मात्र लतिफ भाई यांचा आपल्या साहेबांवर अपर श्रद्धा असल्याने साहेब विवाहाला येणार हा विश्वास होता. ठरल्या वेळेला मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात ग्रामस्थ विवाहासाठी जमले आणि आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज येऊ लागल्यावर सर्वच अवाक झाले. विवाह वेळेपूर्वी शरद पवार यांचे हेलिकॉप्टर मरावडे गावात उतरले.
पवार यांनी चक्क विवाहाला सपत्नीक हजेरी लावल्याने लग्नासाठी आलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतेही चाट पडले. पवार अगदी खास किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील तरच पत्नी प्रतिभा ताई यांच्या सोबत दिसतात . मात्र मंगळवेढा तालुक्यातील एका साध्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहासाठी हेलिकॉप्टर घेऊन सपत्नीक पवार आल्याने आजही गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी आपली नाळ या वयातही किती घट्ट आहे याचे प्रत्यंतर महाराष्ट्रला आले.
पवार यांची राजकीय कारकीर्द पुणे जिल्ह्यातून सुरू झाली असली तरी सोलापूर जील्ह्यावरचे त्यांचे खास प्रेम कधीच लपून राहिलेले नाही. त्यामुळेच त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील माढा लोकसभा मतदारसंघातून लढली होती. गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीच्या हातातून निसटून भाजपचा बालेकिल्ला बनत असल्याची सल पवार यांच्या मनात आहे. यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मंगळवेढा पोटनिवडणुकीत झालेला पराभव पवार यांना जिव्हारी लागला.
तीन टर्म विजयी झालेले आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यात आघाडी सरकारची सत्ता असूनही राष्ट्रवादीला हातातील जागा गमवावी लागली होत . त्यामुळे 80 व्या वर्षीही पुन्हा कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी पवार मरवडे सारख्या छोट्याश्या गावात पोहचले . पवारांच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांशी असलेल्या या अनोख्या नात्यामुळे नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते मात्र कायम आपल्या साहेबांच्या साथीला का उभे राहतात याचे गमक मरावडे येथील विवाह सोहळ्यातून समोर येते .