• Wed. Apr 30th, 2025

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी कालिदास माने यांना  विजयी करावे :  प्रकाश आंबेडकर 

Byjantaadmin

Jan 28, 2023

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी कालिदास माने यांना  विजयी करावे :  प्रकाश आंबेडकर

लातूर : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी   मराठवाडा शिक्षक मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी व शिक्षक प्रतिनिधी सभेचे अधिकृत उमेदवार कालिदास माने यांना विजयी करावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी लातुरात पत्रकारांशी बोलताना केले.
होऊ घातलेली शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन नव्हे तर विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणारा प्रतिनिधी निवडण्यासाठी होत आहे, असे सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की,  या मतदार संघाचे मागच्या अनेक वर्षाच्या काळात प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीचा शिक्षक मतदारांच्या समस्यापूर्तीचा कोणताही अजेंडा नसल्याने मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.  तसेच ग्रामीण भागातील शिक्षक मतदारांपर्यंतही ते आजपावेतो पोहचू शकलेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी व शिक्षक प्रतिनिधी सभेचे आमचे उमेदवार कालिदास माने यांनी प्राधान्याने ग्रामीण भागातील शिक्षक बंधू – भगिनींपर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी, समस्या गांभीर्याने ऐकून घेण्याचे काम आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान अत्यंत शिस्तबद्धरीत्या केले आहे. त्यामुळे मतदारांच्या मनात   कालिदास माने हे आपल्या समस्यांची सोडवणूक करणारे  एकमेव सक्षम उमेदवार आहेत, असा विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वासच कालिदास माने यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे एकंदर परिस्थितीवरून निदर्शनास येत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
राज्यात होत असलेल्या पाच विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीपैकी चार मतदार संघात आम्ही लढतोय. या चारही मतदार संघाचा आपण दौरा केला असून सगळीकडे अत्यंत पोषक असे वातावरण आहे. येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरण अवलंबले जाणार आहे. या धोरणाला आपला विरोध नाही, पण ते अचानक लादले जाऊ नये,असे आपले मत आहे. कारण या शैक्षणिक धोरण बदलाचा सामना केवळ शिक्षकांनाच करावा लागणार आहे, असे नसून तो विद्यार्थ्यांनाही करावा लागणार आहे.ही बाबही याठिकाणी दुर्लक्षित करून चालणार नाही. सत्ताधाऱ्यांना  खाजगीकरणाची ओढ  लागल्याने त्यांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे काम केले आहे.  शिक्षकांना वेतन शासन देते. त्यांच्या पगारावर ४२ हजार कोटींचा खर्च केला जातो. पण पेंशनसारख्या  जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांच्या अडचणी जाणणारा प्रतिनिधी सभागृहात असणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक मतदारांनी प्रथम पसंतीचे मत कालिदास माने यांना देऊन त्यांना विधान परिषदेत पाठवावे, असे प्रतिपादन  आंबेडकर यांनी केले.
कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन – शत्रू नसतो. परस्परांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात, असे सांगताना त्यांनी भारतीय जनता पार्टीला कमी न लेखण्याचे  आवाहन  केले.
यावेळी  उमेदवार कालिदास माने,  अशोक हिंगे पाटील, संतोष वाघमारे, यु.डी. गायकवाड, जगदीश माळी आदीसह शिक्षक – प्राध्यापक, प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed