• Wed. Apr 30th, 2025

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-विक्रम काळे

Byjantaadmin

Jan 28, 2023

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू
केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
अल्पसंख्याक शिक्षक मेळाव्यात विक्रम काळेंचा निर्धार

 

लातूर, – आघाडी सरकारच्या काळात मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेली शिक्षक, कर्मचार्‍यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हे सरकार खोडा घालत आहे. परंतु, शिक्षक, कर्मचार्‍यांच्या हक्काची, सेवानिवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आधार असलेली जुनी पेन्शन योजना लागू करून घेण्यासाठी सरकारला भाग पाडू, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी येथे बोलून दाखविला.
येथील डॉ. महमद इक्बाल उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित उर्दू शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख, मिनाज काझी, रज्जाक अत्तरवाले, रियाज सरगे, प्रा. एम. बी. पठाण, शाहीन पठाण, लायक पटेल, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नगरसेवक राजा मनियार, यास्मीन शेख, रियाज सगरे, नूसरत कादरी, अब्बास शेख, वहीद शेख, मोइज काझी, मन्नान शेख, प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले उपस्थित होते.
विक्रम काळे म्हणाले, माझे वडील वसंत काळे यांच्या तीन निवडणुका, माझ्या तीन निवडणुका व पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या तीन निवडणुकांमध्ये उर्दू माध्यमाच्या शिक्षक व अल्पसंख्याक समाजातील पदवीधर तरुणांनी मोठे सहकार्य केले. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज आपले प्रश्‍न विधानभवनात उपस्थित करून ते सोडवून घेत आहे. मागील सोळा वर्षांत शिक्षकांच्या अनेक समस्या सोडविल्या. शिक्षकांच्या अनुदानासह शाळांना वेतनेत्तर अनुदान सुरू करणे, शिक्षक, कर्मचार्‍यांची भरती, विना अनुदानित शाळांना अनुदान देणे, अल्पसंख्याक मुलांना शिष्यवृत्ती, ईबीसी सवलत कायम ठेवण्यासह आता शिक्षक व कर्मचार्‍यांच्या जुन्या पेन्शनचा विषय मार्गी लावून शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्यात जमा होती. परंतु, हे सरकार सत्तेत आल्यानंतर पेन्शन देण्यास तयार होत नाही. परंतु, पेन्शन ही शिक्षक व कर्मचार्‍यांचा वृध्दापकाळातील सर्वात मोठा आधार आहे. अनेकांचे उपजीविकेचे साधनच पेन्शन आहे. ती लागू करून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, मागील सोळा वर्षांपासून मी शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी झगडत आहे. स्वपक्षीयांसोबत वाद घालून मागण्या मान्य करून घेत आहे. कोरोना काळातील शिक्षक, कर्मचार्‍यांच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले. कोरोना काळात शाळांची पटसंख्या कमी झाली होती. त्यावेळी संच केले असते तर राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले असते. परंतु, माझ्या मागणीमुळे तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजपर्यंत जानेवारी २०२० चीच संच मान्यता कायम ठेवली आहे. हे सध्या निवडणूक लढवत असलेल्या एकाही उमेदवाराच्या लक्षात आले नाही, असे सांगून पुढे ते म्हणाले, मी मराठवाड्यातील शाळांना साडे नऊ कोटी रुपयांची पुस्तके भेट दिली आहेत. यापुढे उर्दू शाळांनाही लवकरच पुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी दिल्ली येथील छापखान्यात ऑर्डर दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मोईज शेख म्हणाले, विक्रम काळे यांना स्व. वसंत काळे यांच्याकडून लोकांची कामे करून देण्याचा वारसा मिळाला आहे. आम्ही औरंगाबादला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यापीठातील सर्वच प्रश्‍न त्यांच्या पुढाकारातून सोडवित होते. तेच काम विक्रम काळे हे मागील सोळा वर्षांपासून करीत आहेत. यामुळे उर्दू माध्यमाच्या प्रत्येक शिक्षकाने त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन शेख यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed