उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.
पवार यांच्यासोबत चांगले सख्य
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो. मात्र नाना पटोलेंच्या या विधानामुळे आंबेडकर यांना महाविकास आघाडीत स्थान मिळेल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
नाना पटोले यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असून आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्तावही आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडन कहाणी आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही.