• Wed. Apr 30th, 2025

बारावी परिक्षेचे हॉल तिकीट आज मिळणार:बोर्डाच्या वेबसाईटवरुन सकाळी 11 वाजेपासून करता येणार डाऊनलोड

Byjantaadmin

Jan 27, 2023

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परिक्षेचे हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांनी हॉल तिकीटचे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी सूचना उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे.

शाळा, महाविद्यालयांनी प्रिंट करुन द्यावीत

बोर्डाच्या www.mahahssscboard.in या संकेतस्थळावर सकाळी 11 वाजेपासून विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. संकेतस्थळावरील college login मध्ये जाऊन उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्रिंट करुन द्यावीत, असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे. बारावीची बोर्ड परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 दरम्यान होत आहे.

विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये

विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचे प्रिंट काढून द्यावे व त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. हॉलतिकीट प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. हॉलतिकीट डाऊनलोड होत नसल्यास किंवा काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे.

हॉलतिकीटमध्ये काही चूक असल्यास

हॉलतिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. हॉलतिकीटमधील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे, अशी सूचना बोर्डाने केली आहे.

हॉलतिकीट हरवल्यास

विद्यार्थ्याकडून हॉलतिकीट हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा हॉलतिकीटची प्रिंट काढावी व त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत ( Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास हॉलतिकीट द्यावे, अशी सूचनाही मंडळाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed