लोकशाही बळकट करण्यासाठी
प्रत्यकाने मतदानाचा हक्क बाजाविणे आवश्यक
– डॉ. सुचिता शिंदे
- राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा
- नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण
- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, बीएलओ यांचा गौरव
लातूर, (जिमाका) : वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार नोंदणी करावी. तसेच आपली लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निर्भयपणे आणि कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रत्येक निवडणुकीत सजगपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी आज येथे व्यक्त केले.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीमती डॉ. शिंदे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अॅड. श्रीकांत उटगे होते. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, प्राचार्य दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, लातूर तहसीलदार कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे, निवडणूक दूत बसवराज पैके, डॉ. रत्नाकर बेडगे, शुभम निकम यावेळी उपस्थित होते.
31 डिसेंबर 2005 पूर्वीची जन्मतारीख असलेल्या प्रत्येकाला मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. पारंपारिक पद्धतीसोबतच ‘व्होटर हेल्पलाईन अॅप’च्या माध्यमातूनही मतदार नोंदणी करता येते. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. तसेच आपल्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींना मतदार नोंदणी आणि मतदानासाठी वेळोवेळी प्रोत्साहित करावे. युवक हेच देशाचे भविष्य असून मतदार नोदणीच्या प्रक्रियेत त्यांनी पुढाकार घ्यावा. महिलांनीही यामध्ये मागे न राहता आपला हक्क बजावावा, असे आवाहन श्रीमती डॉ. शिंदे यांनी केले.
भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून नागरिकांना मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. नागरिकांना मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी मतदार नोंदणी ते प्रत्यक्ष मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा राबत असते. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे, असे उपविभागीय अधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले.
श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाच्या मताला भारतीय लोकशाहीत समान मूल्य आहे. आपला नेता, प्रतिनिधी निवडण्याचा सर्वांना समान अधिकार मिळाला आहे. प्रत्येकाने सहज राहून या अधिकाराचा वापर करण्याची गरज आहे. समाजात मतदान प्रक्रिया आणि मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी युवकांनी सक्रीय पुढाकार घ्यावा. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्यकाने निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावावा, असे माजी प्राचार्य डॉ. गायकवाड यावेळी म्हणाले.
भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार लोकशाही व्यवस्थेत देण्यात आलेला मतदानाचा अधिकार हा बहुमुल्य आहे. हा अधिकार निर्भयपणे वापरून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे अॅड. उटगे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले.
प्राचार्य डॉ. मौने यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे महत्व विशद केले. उपप्राचार्य डॉ. लखादिवे, निवडणूक दूत श्री. पैके, श्री. निकम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय निवडणूक दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच मतदार नोदणी मोहीम आणि निवडणूक विषयक कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा संदेश, निवडणूक आयोगाची निर्मिती असलेले ‘मै भारत हू, हम भारत के मतदाता है’ हे गीत यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती डॉ. शिंदे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले, डॉ. संजय गवई यांनी उपस्थितांचे आभार मानले.