• Tue. Apr 29th, 2025

बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड!

Byjantaadmin

Oct 1, 2022
बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड!
भारत जोडो’च्या मदतीच्या मोबदल्यात दसरा मेळाव्यासाठी काँग्रेसी गर्दीची तडजोड
माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची घणाघाती टीका
लातूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी असून आता पेंग्विन सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही आ.निलंगेकर यांनी केला.
दसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे असल्याने उरल्यासुरल्या पेंग्विन सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली असल्‍याचे सांगत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे गुडघे टेकल्याने ठाकरे यांचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला असल्‍याचे दिसून येत आहे. विश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची विल्हेवाट लावली. आता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली आहे, असा गौप्यस्फोट आ.निलंगेकर यांनी केला. मुख्यमंत्रीपदाची हाव आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण पक्ष पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे भवितव्यच या मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनावरच अवलंबून असल्याने काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था केलेली पाहून कीव येते, असेही आ.निलंगेकर यांनी नमूद केले.
 ठाकरे यांनी २०१९ मध्ये जनादेशाचे पालन केले असते, तर आपल्या हाताने पक्षाच्या विसर्जनाची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी लगावला. ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याची हवा अगोदरच निघून गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईचा वापर करून गर्दीसमोर वल्गना करण्यापलीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची ठाकरे यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच अडीच वर्षांच्या सत्ताकाळात दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांखेरीज पक्षाचे अस्तित्व टिकविणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच उरतणीला लागलेल्या या पक्षांच्या आधाराने उरलासुरला गट टिकविण्याची धडपड संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे, असेही माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed