गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. महाविकास आघाडीकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आज आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावत टीकास्र सोडलं आहे
देवेंद्र फडणवीसांनी कार्यक्रमात बोलताना ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. “माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं”, असं फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करताना देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हटलं. “देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. मला वाटतं दिलीप वळसे पाटील त्याच्यावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी. मला देवेंद्र फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं की गॉसिप किंवा खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी एक गृहमंत्री म्हणून त्यांनी पुण्यातील कोयता गँग, धायरीत वादादरम्यान पिस्तुलं काढण्याच्या घटनेवर बोलावं. त्यांनी हे काय कुठलं काढलंय हे त्यांनाच माहिती”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
“सुप्रियाताईंना ‘तो’ आजार होऊ नये…”
सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर आता भाजप आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. “सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचं दाखवलंय. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसतायत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंच शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.