• Wed. Apr 30th, 2025

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन

Byjantaadmin

Jan 24, 2023

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या

लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन

लातूर, दि. 24 (जिमाका) : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना 17 व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. हा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आणि लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. या बाबी पूर्ण झाल्या तरच योजनेचे पुढील हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होतील. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी ई-केआयसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ई-केवायसी करण्याचा पर्याय पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अँपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वतः ई-केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे ई-केवायसी प्रमाणिकरण बायोमेट्रीक पद्धतीने करता येईल. केंद्रशासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमेट्रीक पध्दतीनी ई- केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी प्रतिलाभार्थी प्रतिबायोमेट्रीकरणाचा दर पंधरा रुपये निश्चित करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जावून आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी.

लातूर जिल्ह्यातील पी. एम किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेत जावून लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

बँक खाते आधार क्रमांकास जोडणे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी तालुकानिहाय संख्या (एकूण-29049) लातूर-2598, औसा-3896, रेणापूर-2755, चाकुर-3153,निलंगा- 7621, अहमदपूर- 1876, देवणी- 2460, जळकोट- 1601, शिरुर अनंतपाळ- 1013, उदगीर- 2086.

ई-केवायसी प्रलंबित लाभार्थी संख्या (एकूण-  48220) :  लातूर- 6544, औसा- 8264, रेणापूर- 4522, चाकुर- 4272, निलंगा- 8288, अहमदपूर- 4808, देवणी- 2386, जळकोट- 2995, शिरूर अनंतपाळ- 1784, उदगीर- 4357.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *