• Wed. Apr 30th, 2025

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर हॉलिबॉल स्पर्धेचे यंदा लातुरात आयोजन

Byjantaadmin

Jan 24, 2023

छत्रपती शिवाजी महाराज चषक
राज्यस्तर हॉलिबॉल स्पर्धेचे यंदा लातुरात आयोजन
• जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आढावा
• 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार स्पर्धा
लातूर, दि. 24 (जिमाका) :सन 2022-23 मधील छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर हॉलिबॉल स्पर्धेचे 14 ते 18 फेब्रुवारी 2023 दरम्यान लातूर येथे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत राज्याच्या क्रीडा व युवक सेवा विभागाचे सूचना प्राप्त झाल्या असून या स्पर्धांच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.
क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कार्थी तथा जिल्हा हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख, महाराष्ट्र राज्य हॉलिबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक, जिल्हा हॉलिबॉल असोसिएशनचे सचिव दत्ता सोमवंशी, सहसचिव सय्यद मुजीब समिया, उपाध्यक्ष महेश पाळणे, राजर्षि शाहू महाविद्यालयाचे डॉ. अनिरुद्ध बिराजदार, दयानंद महाविद्यालयाचे प्रा. एन. एम. सदाफुले यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर हॉलिबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूरमध्ये आयोजन होत आहे. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय विभाग, राज्य हॉलिबॉल संघटना, जिल्हा हॉलिबॉल संघटना यांची भूमिका महत्वाची असून सर्वांनी समन्वयाने काम करून ही स्पर्धा यशस्वी करूया. यानिमित्ताने जिल्ह्यातील हॉलिबॉल खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
स्पर्धा आयोजनासाठी तांत्रिक समिती, निवास व्यवस्था, भोजन, वाहतूक व्यवस्था यासह इतर अनुषंगिक बाबींवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा झाली. क्रीडा उपसंचालक श्री. मोरे यांनी स्पर्धेच्या आयोजानाबाबत माहितीचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *