मुंबई:-उद्योग पळवले, आर्थिक केंद्र तिकडे नेले. आता त्यांना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायचीय. मात्र, काही झाले तरी मुंबई लुटू देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेला मेट्रो उदघाटन कार्यक्रम आणि भाषणाला जोरदार प्रत्युत्त दिले.
मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘साहेब जन्मदिवस’ कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.
अमेरिकेचे अध्यक्ष भाजपच्या वाटेवर…
उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दार विकले जाऊ शकतात. ते विकत घेता येऊ शकतात. मात्र, इथे जमलेले विकणे जाणे शक्य नाही. विकत घेता येणे शक्य नाही. संजय राऊत अनुभव सांगत होते. त्यांनी गोऱ्या माणसांची आठवण सांगितली. मलाही येता येता एक माहिती कळली. मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. ते काळजीत होते. मला म्हणाले मुद्दामहून इथे आलो आहे. ते म्हणाले उद्या भाजपमध्ये चाललोय. त्यांच्या घरावर एफबीआयने रेड टाकल्याची बातमी वाचली. त्यांना काही कागदपत्रे सापडली. त्यामुळेच उद्या अमेरिकेचे अध्यक्ष मिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्याची बातमी येईल, असा टोला त्यांनी हाणला.