• Wed. Apr 30th, 2025

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देणार, पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

Byjantaadmin

Jan 23, 2023

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला पदमुक्त व्हायचं आहे असं त्यांनी ठरवलं आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये ते असं म्हणाले होते की छत्रपती शिवाजी हे महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत. नव्या काळातले आदर्श नितीन गडकरी आहेत. या त्यांच्या वक्तव्यावरून बराच गहजब झाला होता. मात्र त्यांनी महापुरूषांचा अपमान करण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधीही महाराष्ट्रात त्यांनी अनेक महापुरूषांचा अपमान केला. छत्रपती शिवरायांबाबत जे वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात डिसेंबर महिन्यात महामोर्चाही काढला होता. तसंच डिसेंबर महिन्यात नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपल्या भाषणात राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेतला होता.

राज्यपालांनी मुंबईबाबत काय वक्तव्य केलं होतं ?

कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की गुजराथी आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही. या त्यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली होती ज्यानंतर राज्यपालांनी माफी मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *