महाराष्ट्रात आज क्रांतीकारक घोषणा होईल. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा आज संयुक्त पत्रकार परिषदेत करतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
राज्याच्या राजकारणात नवे पर्व
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आजपासून नवे पर्व सुरू होत आहे. नायगाव येथील आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महत्त्वपूर्ण घोषणा करतील. कुणी याला राजकारण म्हणेल. पण, देश तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात हे एक क्रांतीकारक पाऊल ठरणार आहे
महाशक्तीसमोर कोणाचा टिकाव लागणार नाही
संजय राऊत म्हणाले, शिवशक्ती आणि भीमशक्ती ही दोन विचारांची युती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि घटनानिर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राज्याच्या राजकारणात एकत्र येत आहेत. आंबेडकर आणि ठाकरे यांची ही युती महाशक्ती ठरेल. त्यामुळे महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल. या शक्तीपुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही.
उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुखपदाचा काळ आजच संपुष्टात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कुणाची? हाच सवाल निर्माण झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत निवडणुकाही थांबल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा आजचा अखेरचा दिवस आहे. यावर संजय राऊत म्हणाले, खरे तर ही तांत्रिक बाब आहे. याने फार काही फरक पडत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत आणि राहतील.
असे नेतृत्व शतकातून एकदाच
बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांची आठवण काढत संजय राऊत म्हणाले, शिवसेना हे चार अक्षर राजकारणात नसते तर महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची पिढी केव्हाच आली नसती. बाळासाहेब ठाकरे यांनी साध्या, फाटक्या लोकांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री बनवले. राजकीय पाठबळ नसताना त्यांनी तरुणांना पुढे आणले. असे नेतृत्व शतकातून एकदाच जन्माला येते.
तसेच, शिवसेनेत कोणतेही दोन गट नाहीत. देशात हा प्रश्ननच नाही. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.