राज्यातील तापमानात सध्या चढ-उतारांचा खेळ सुरू आहे. आज पुन्हा राज्यातील काही भागांत थंडी वाढली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून पुढील काही दिवस तरी नागरिकांची सुटका नाही, अशी शक्यता आहे.
अशात राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 25 जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
कमाल तापमानात वाढ, मात्र गारठा कायम
राज्यभरात सोमवारपासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यंदाच्या मोसमात पावसाळा लांबल्याने यंदाचा हिवाळा बराच काळ सुरू राहील असा अंदाज आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी राज्यात थंडी कमी होत जाईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, काही भागांत थंडीचा जोर पुन्हा वाढलेला दिसत आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा टिकून आहे. पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वरला हुडहुडी
दुसरीकडे, महाराष्ट्राचे नंदनवन प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे गारठा चांगलाच वाढला आहे. रविवारी तर येथील तापमान 4 अंशांपर्यंत घसरले होते. त्यामुळे पर्यटक कडाक्याच्या थंडीत पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहे. प्रामुख्याने येथील प्रसिद्ध वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.
उत्तर भारतातही पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि शेजारच्या भागावर चक्रीवादळाच्या रूपात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी पाऊस झालाही आहे. 24 ते 27 जानेवारी दरम्यान दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात 25 ते 27 जानेवारी दरम्यान हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे