• Wed. Apr 30th, 2025

छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार!

Byjantaadmin

Jan 22, 2023

छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा

शासकीय सोहळा साजरा होणार!

शिंदे-फडणवीस सरकारचे माजीमंत्री आ.निलंगेकराकडून अभिनंदन

लातूर प्रतिनिधी:-स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दांत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंतीदिनी शासकीय-निमशासकीय कार्यालयांत राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनाचा समावेश करून सरकारने संभाजीराजांच्या अद्वितीय पराक्रमी इतिहासाचा सन्मान केला आहे, असे माजीमंत्री आ.निलंगेकर म्हणाले. १४ मे रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतही छत्रपती संभाजीराजांचा जयंतीदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल असेही ते म्हणाले. स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे शौर्य, ज्वलंत धर्माभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली अपार निष्ठा हे गुण म्हणजे महाराष्ट्राच्या तेजस्वी परंपरेचा वारसा आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे हा तेजस्वी वारसा नव्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल व स्वराज्य व स्वधर्माच्या अभिमानाचे संस्कार नव्या पिढ्यांवर घडविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. शासकीय पातळीवर राष्ट्रपुरुषांचे जयंती सोहळे साजरे करण्याची प्रथा आता परिपूर्ण झाली, अशा शब्दांत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी समाधान व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक राज्य सरकारने बुधवारी, १८ जानेवारी रोजी जारी केले असून राष्ट्रपुरुष व महान व्यक्तींचे जयंती सोहळे साजरे करण्याच्या कार्यक्रमासंबंधी मंत्रालय तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *