• Wed. Apr 30th, 2025

“लातूरचा देशमुख वाडा…”, भाजपा प्रवेशावर अमित देशमुखांनी सोडलं मौन

Byjantaadmin

Jan 13, 2023

सांगली:-गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर आता अमित देशमुखांनी भाष्य केलं आहे.

सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, “तूर्त तरी सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाचं सरकार आहे, असं मानावं लागेल. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरु होणार आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हा प्रश्न पडला आहे. पाच वर्षे चमत्कारिक राहिली. महाराष्ट्रात पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षाचं आणि आता तिसऱ्या सरकारचा कार्यकाळ सुरु आहे. चौथं सरकार कधीही येऊ शकतं,” अशी मिश्कील टीप्पणी अमित देशमुख यांनी केली.

“महापालिका निवडणुका कधी होतील हे सुद्धा सांगता येत नाही. सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपात या म्हणत आहेत, पण तुम्हीच स्वगृही परतावे. तसेच, लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली, कितीही वारे आले तरी तो तिथेच राहणार,” असं स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिलं आहे.

दरम्यान, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशावर गुरुवारी प्रतिक्रिया दिली होती. “भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत. मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा,” असं संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed