मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेत आपले पुत्र सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी मार्ग मोकळा केला होता. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पण सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी पत्ते उघड करत ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे सत्यजीत यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी काँग्रेस पक्षावर रिंगणात उमेदवार नसण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबे आणि त्यांच्या मुलावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. ‘माझ्यापर्यंत जी काही ऐकीव माहिती पोहोचली आहे त्यावरुन हे प्रकरण गंभीर वाटत आहे. पक्षश्रेष्ठींनी या सगळ्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, किंबहुना त्यांनी घेतली आहे. हा विषय आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना कदाचित यातील अधिक माहिती असू शकेल. हे सगळं का घडलं, यामागील वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. या सगळ्यामुळे पक्षाला एक जागा गमवावी लागत आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे’, असे चव्हाण यांनी म्हटले.
‘काँग्रेस पक्षाचे मूळ उमेदवार असलेल्या सुधीर तांबे यांनी उमेदवारी दिली असताना नामांकन पत्र भरले नाही. त्यांच्याऐवजी त्यांच्या चिरंजीवांनी अपक्ष अर्ज भरला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की, तो फॉर्म मी कोरा एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनाही अपक्ष अर्ज भरता आला असता. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वाटत आहे, ‘असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही: नाना पटोले
एकीकडे तांबे पितापुत्रांवर कारवाई होण्याचे संकेत मिळत असतानाच नाना पटोले यांनी शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. ‘सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि भाजपच्या नेत्यांकडे पाठिंब्याची मागणी करणे, हे सर्व पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरून काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांन स्पष्ट केले.