शिवसेनेवरील दाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील खटला सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यांच्या पीठासमोर सुरू आहे. तेव्हापासून दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या प्रकरणाची सुनावणी आज म्हणजेच 10 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगापुढेही सुनावणी
तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगापुढेही आज धनुष्यबाण कुणाचे?, यावर शिंदे व ठाकरे गटाकडून बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांकडून लाखो सदस्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही धनुष्यबाणाबाबत निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयासोबतच निवडणूक आयोगापुढेही काय सुनावणी होते, याकडे लक्ष असणार आहे.
ठाकरे गटाकडून एका मुद्द्यावर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. यात आता ठाकरे गटाच्या या मागणिवरही न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.