नवी दिल्ली:/अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे.
ठाकरे गटाकडून एका मुद्द्यावर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाकडे सुनावणी सुरू झाली.
ठाकरे गटाचे म्हणणे काय?
ठाकरे गटाला या खटल्यातील एका मुद्द्यावर सात न्यायमूर्तींचे खंडपीठ हवे आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत अधिकाराचा हा मुद्दा आहे. विधानसभेच्या पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही?, हे या खटल्यातून स्पष्ट होणार आहे.
2016 च्या अरुणाचल प्रदेशच्या नबाम रबिया खटल्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले होते. नबाम रबिया खटल्यामध्ये निकाल पाच न्यायमूर्तींच्या पीठाचा होता. अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील स्थिती वेगळी असल्याने या मुद्द्यावर अधिक खल व्हावा हा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे.