मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे बुधवारी जिल्ह्यात आगमन
• जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार स्वागत
• शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांचा सहभाग
लातूर, (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘चला जाणुया नदीला’ उपक्रमांतर्गत आयोजित मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे बुधवारी (दि. 11) लातूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. यानिमित्त लातूर तालुक्यातील सारसा येथे आयोजित कार्यक्रमात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंग जलसंवाद यात्रेचे स्वागत करतील. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिवन गोयल यावेळी उपस्थित राहतील.
11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि निलंगा तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या 26 गावांमधून ही जलसंवाद यात्रा मार्गक्रमण करणार आहे. 12 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता ही यात्रा लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे येणार असून डॉ. राजेंद्र सिंग यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत ही यात्रा मार्गस्थ केली जाईल. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, पोस्ट ऑफिस मार्गे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात येईल.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये मांजरा नदी जलसंवाद यात्रा प्रबोधन कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे असतील. तसेच पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, मराठवाडा विभागीय समन्वयक अनिकेत लोहिया, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश मौने, मांजरा जनसंवाद यात्रेचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ. संजय गवई, सहसमन्वयक कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, सदस्य बी. पी. सूर्यवंशी आणि डॉ. गुणवंत बिरादार यांची यावेळी उपस्थित राहतील.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मांजरा नदी जलसंवाद यात्रा प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाला लातूर शहरातील वृक्षप्रेमी, नदीप्रेमी, संशोधक, अभ्यासक, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक वनरक्षक वैशाली तांबे यांनी केले आहे.