महाराष्ट्र महाविद्यालयाच्या वसुंधरा अपसिंगेकरची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड
निलंगा : येथील महारष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कु. वसुंधरा अपसिंगेकर हिची निवड झाली आहे. दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पथसंचलन (परेड) करिता महाराष्ट्र महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व ती करणार आहे. या निवडीपूर्वी तिने राज्यस्तरीय निवड चाचणी शिबारासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व पश्चिम विभागीय निवड चाचणी शिबिरासाठी सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर जि. आनंद गुजरात येथे सहभाग घेतला होता. या निवडचाचणीतून राज्यस्तरीय पथसंचलन (परेड) करिता ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कु. वसुंधरा अपसिंगेकर व तिचे वडील श्री बंडू अपसिंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा. विजय पाटील निलंगेकर यांनी विद्यार्थिनीचे कौतुक करून पथसंचलनासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनीही याप्रसंगी कु. वसुंधरा अपसिंगेकर हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, डॉ. अरुण धालगडे, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती. विद्यार्थिनीच्या या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले आहे.