• Tue. Apr 29th, 2025

विश्वासार्हतेसाठी सकारात्मक पत्रकारितेची गरज – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

Byjantaadmin

Jan 7, 2023

विश्वासार्हतेसाठी सकारात्मक पत्रकारितेची गरज – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने  दर्पण दिन उत्साहात

लातूर प्रतिनिधी

 लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आजही समाजाचा विश्वास टिकून असून पत्रकारिता हे सहजतेने घेण्याचे माध्यम नाही तर ती मोठी जबाबदारी आहे. तथापि समाजमाध्यमांवरील बऱ्याच निराधार बातम्यांमुळे  जनमाणसाचा पत्रकारीतेकडे पाहण्याचा  दृष्टिकोन बदलत आहे. हे वास्तव जाणून पत्रकारीतेचे पावित्र्य व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सकारात्मक पत्रकारीता आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी येथे  केले.

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून व्हॉइस ऑफ मीडिया लातूर जिल्हा शाखेच्या वतीने ६ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात  दर्पण दिन कार्यक्रम व व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा घेण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व मुख्य सत्कारमूर्ती जयप्रकाश दगडे होते.  जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष बालाजी फड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांचा येथे सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी संघटनेच्या पत्रकारांना प्रशिक्षण देण्याच्या संकल्पाचे स्वागत करुन आजघडीस हे प्रशिक्षण किती अनिवार्य आहे याचा दाखला त्यांनी सोशल मीडियातून प्रसिद्ध झालेल्या एका  निराधार वृत्ताच्या उदाहरणाद्वारे दिला.पत्रकारांच्या हितासाठी संघटना जे कार्य करणार आहे त्यासाठी प्रशासन म्हणून सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी  दिली.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील विविध माध्यामातील  पत्रकारितेचा रंजक प्रवास उपस्थितांसमोर ठेवला.  अध्यक्षीय समारोपात  जयप्रकाश दगडे यांनी,  पत्रकारांचा आरोग्य विमा काढण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा आणि पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे त्यासाठी शहर परिसरात शासकीय जमिनीचा शोध घेवून त्याबाबत शासन-प्रशासनाला अवगत करावे व संघटनेने सरकारदरबारी पाठपुरावा करावा असे सांगितले.

प्रास्ताविकात  जिल्हाध्यक्ष बालाजी फड यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचा दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा काढणार असल्याची घोषणा केली. तसेच  पत्रकारांसाठी प्रशिक्षण, निवास व निवृती वेतन आदींबाबत संघटना पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रवक्ते अनिल पुरी यांनी केले. आभार जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार यांनी मानले.

या कार्यक्रमास संघटनेचे सरचिटणीस संगम कोटलवार ,सुशांत सांगवे, निशांत भद्रेश्वर, रामेश्वर धुमाळ, बाळासाहेब जाधव, श्रीराम जाधव, प्रदीप कवाळे विजय कवाळे माऊली परांडे,आनंद माने,योगिराज पिसाळ , काकासाहेब घुटे, प्रभाकर शिरुरे,रंगनाथ सगर, उमाकांत उफाडे, यशवंत पवार,  पंकज जैस्वाल,धोंडीराम ढगे, दिलीप मुनाळे, आदींसह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

……………….

शहरकर गुरुजींचा सत्कार :

पत्रकारीतेसाठी मोठे योगदान दिलेले ज्येष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्यसेनानी  जीवनधर शहरकर गुरुजी यांचा त्याच्या निवास्थानी जावून व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed