दर्पण दिनानिमित्त श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल येथे पत्रकारांचा सत्कार
लातूर, (प्रतिनिधी) – प्रत्येक मुलाने आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करीअर करण्यासाठी शिक्षणाची पहिली पायरी कष्टाने पूर्ण करणे गरजेचे आहे. पत्रकारिता हे क्षेत्र मुलांसाठी ग्लॅमर म्हणून खुनावणारे क्षेत्र असले तरीही यामध्ये सजगता, चिंतन आणि संवेदनशिलता यासोबतच अभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे. या क्षेत्रात येऊ पाहणार्या मुलांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण करून आवड असेल तरच आव्हान म्हणून या क्षेत्रात यावे, असे प्रतिपादन पत्रकार दिपरत्न निलंगेकर यांनी केले.
श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल च्या वतीने दर्पण दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या सत्कारासोबतच विद्यार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पत्रकार दिपरत्न निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळगे हे होते. यावेळी पत्रकार अभय मिरजकर, एजाज शेख, शशिकांत पाटील, प्रा.डॉ. सितम सोनवणे, वामन पाठक यांचा संस्थेच्या वतीने चित्रकला शिक्षक दिपक कांबळे यांनी रेखाटलेली बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
शालेय जिवनामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्र खुनावत असतात. अनेकवेळा मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असा पालकांचा आग्रह असतो त्यामुळे मुलांना आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. तेव्हा शालेय जीवनापासून मुलांनी आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्याविषयी सजगता बाळगावी. प्रशासकीय सेवेसोबतच पत्रकारिता क्षेत्रामध्ये देखील करिअर करण्याच्या मोठ्या संधी आहेत. तेव्हा शालेय जिवनातच आपले ध्येय निश्चित करावे, असेही पत्रकार निलंगेकर यावेळी म्हणाले.
यावेळी राजेंद्र कोळगे, शशिकांत पाटील, एजाज शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका विनया मराठे, सोनाली कुलकर्णी, विशाखा पाटील, अशिष कोळगे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कमल पत्की यांनी तर आभार चित्रा परळकर यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो. १०) बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.