• Tue. Apr 29th, 2025

मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावावी – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Byjantaadmin

Jan 7, 2023

मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकाऱ्यांनी

आपली जबाबदारी चोखपणे बजावावी

– जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

  • मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण

लातूर, (जिमाका) : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 30 जानेवारी रोजी होणारी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिल्या.

05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रावर मतदान होणार असून यासाठी प्रत्येकी चार अधिकाऱ्यांचा समावेश असलेली 51 पथके, 20 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण दयानंद महाविद्यालय सभागृहात झाले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन केले. तहसीलदार महेश सावंत यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते.

मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या समजून घेवून त्या सुरळीतपणे पार पाडाव्यात. मतदान प्रक्रिया निःपक्षपाती व शांततामय वातावरणात होण्यासाठी सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

अपर जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना प्राप्त मतदान साहित्य तपासणी, मतदान पथक रवाना करणे, आदर्श मतदान केंद्र स्थापित करणे, मतदान अधिकारी व त्यांची कर्तव्ये, मतदान केंद्राध्याक्षांची कर्तव्ये आणि कामे, मतदान प्रतिनिधी नेमणूक, मतपेटी सील करणे आदी बाबींचे प्रशिक्षण दिले. सहायक पुरवठा अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत व त्यांच्या चमूने मतदान प्रक्रीयेविषयीचे व्हिडीओ तयार करून त्याचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed