भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने मुंडे भगिनींना डावलल्याची चर्चा सुरु आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघ डोळ्यासमोर ठेवून जे.पी. नड्डा यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून नड्डा यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभेला उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय केनेकर यांची या निमंत्रण पत्रिकेत नावं आहेत.
मिशन 144 ची सुरुवात
मिशन 144 अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मिशन 144 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चंद्रपुरातून होणार आहे. त्यानंतर औरंगाबादला सायं. 5 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होईल.
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाल्यानंतर जे.पी. नड्डा सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठकही घेणार आहेत. मात्र कार्यक्रमासाठी, तसेच इतर बैठकांसाठी देखील पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना निमंत्रण नसल्याचे मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल्याची चर्चा आहे.
महिला नेतृत्वाची कमतरता?
सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत मराठवाड्यतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत. मात्र मराठवाड्यात होत असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रम पत्रिकेवर देखील एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपमध्ये महिला नेत्यांना स्थान नाही अशाही चर्चा रंगत आहेत.