उत्तर प्रदेशात 3 जानेवारीपासून भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. तत्पूर्वी 1 दिवस अगोदर राहुल गांधी यांनी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते कमल हासन यांच्याशी भारतीय राजकारण व संस्कृतीवर चर्चा केली. राहुल यांनी चर्चेची ही क्लिप सोशल मीडियावर शेयर केली. त्यात ते म्हणाले – पाश्चिमात्य देश चीनवर मात करू शकतात हे त्यांना मान्य नाही. हे काम केवळ भारतच करू शकतो.
हा खास वार्तालाप सुरू करताना राहुल गांधी हासन यांना म्हणाले – देशात जे काही सुरू आहे त्यावर तुम्हाला काय वाटते हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यावर कमल हासन सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले – “मला वाटते आज देशात जे काही सुरू आहे त्यावर बोलणे माझे कर्तव्य आहे. हे 2800 किमी काहीच नाही. तुम्ही रक्त-घामाचा विचार न करता चालत राहा.”
जवळपास 4 वर्षांपूर्वी राजकारणाऱ्या आखाड्यात उतरलेल्या 68 वर्षीय हासन यांनी यावेळी भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला.
राहुल भारत-चीनच्या संबंधांची तुलना रशिया-युक्रेनशी करताना म्हणाले – रशियाने युक्रेनला पाश्चिमात्य देशांपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. युक्रेन व पाश्चिमात्य देशांतील संबंध मजबूत झाले तर आम्ही तुमचा भूगोल बदलून टाकू असे रशिया म्हणाला होता. हाच सिद्दांत आपण भारतात पाहू शकतो. भारत अंतर्गत प्रश्नांशी संघर्ष करत असल्याचे चीनला ठावूक आहे. त्यामुळेच तो त्याला जे हवे आहे ते करत आहे.
चीन आपल्याला सांगत आहे – आपण जे करत आहोत त्यात सावधगिरी बाळगा. अन्यथा आम्ही तुमचा भूगोल बदलून टाकू. आम्ही लडाख, अरुणाचलमध्ये येऊ. राहुल म्हणाले – एक भारतीय म्हणून चीन रशियासारखीच पार्श्वभूमी तयार करत असल्याचे मला वाटते. त्यामुळे मी माझ्या देशाला सतर्क करत आहे.

राहुल यांनी हासन यांना भेट दिला वाघाचा फोटो
राहुल गांधींनी यावेळी कमल हासन यांना वाघाचा फोटो गिफ्ट केला. हा फोटो प्रियंका गांधी यांचे सुपुत्र रिहान यांनी क्लिक केला होता. ते कमल यांना म्हणाले – ‘या छायाचित्रातून तुमचे व्यक्तिमत्व अधोरेखित होते. तुम्ही एक महान भारतीय व चॅम्पियन आहात हे हे छायाचित्र सांगते.

दिल्लीतील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते हासन
कमल हासन यांनी 24 डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचलेल्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. ते राहुल यांच्यासोबत चालताना चर्चा करतानाही दिसले होते. माध्यमांनी त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले होते, ‘अनेकजण मला मी यात्रेत का सहभागी झालो हा प्रश्न विचारत आहेत. मी येथे एक भारतीय म्हणून आलो आहे. माझे वडील काँग्रेस कार्यकर्ते होते. माझे वेगळे विचार होते. मी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. पण जेव्हा देशाची गोष्ट येते, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांच्या रेषा अंधूक होतात. मी ती रेषा मोडून येथे आलो.’
यात्रेत सहभागी झाल्याच्या एका दिवसानंतर कमल म्हणाले होते की, मातृभाषा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. इतर भाषा शिकणे व त्यांचा वापर करणे वैयक्तिक आवड असते. हाच मागील 75 वर्षांपासून दक्षिण भारताचा अधिकार आहे. हिंदी दुसऱ्यांवर थोपणे मूर्खपणा आहे. दक्षिणेत त्याचा विरोध केला जाईल.