• Tue. Apr 29th, 2025

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा?

Byjantaadmin

Dec 28, 2022

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. तसेच भारत जोडो यात्रेतील गर्दी बघता राहुल गांधी यांच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यातसाठी केंद्र सरकारने तत्काळ पावलं उचलावी, अशी मागणीही त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा २४ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत दाखल झाली होती. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. भारत जोडो यात्रेतील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आले. त्यावेळी परिस्थिती इतकी गंभीर होती की, अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्याभोवती घेरा घालावा लागला. दिल्ली पोलिसांनी केवळ बघायची भूमिका घेतली होती”, असा आरोप के.सी. वेणुगोपाल यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटी आणि इतर लोकांची आयबीकडून चौकशी करण्यात येत आहे. संविधानानुसार प्रत्येकाला कोणत्याही रॅलीत सहभागी होण्याचा अधिकार आहे. मात्र, तपास यंत्रणांकडून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसने २३ डिसेंबर रोजी यासंदर्भात हरियाणाच्या सोहना सिटी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील होती, असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत सरकारने राहुल गांधी यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासासाठी तत्काळ पावलं उचलावी, अशी मागणीही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed