• Tue. Apr 29th, 2025

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश

Byjantaadmin

Dec 28, 2022

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार
शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश
• 10 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन• लातूर जिल्ह्यातील दोन शाळांची निवड

लातूर, दि. 28 (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लातूर आणि जळकोट येथील प्रत्येकी एका शाळेची निवड करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
लातूर येथील कळंब रोड, एमआयडीसी येथील स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल आणि जळकोट येथील कुणकी रोडवरील महात्मा फुले पब्लिक स्कूलची या योजनेसाठी निवड झाली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 4 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार मोफत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज, जातीचा दाखला, जन्माचा दाखला, बोनाफाईड, पालकाचे उत्पन्न (एक लाखाचे आत असावे) दाखला सादर करणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेला अर्ज व कागदपत्रे लातूर येथील समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात सादर करावीत. अधिक माहितीसाठी श्रीमती प्रणिता सूर्यवंशी (भ्रमणध्वनी क्र. 7972535516) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed