राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (२८ डिसेंबर) तुरुंगाबाहेर माध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”
“उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.