दिवाळी सणात मनपा मार्फत विशेष स्वच्छता मोहीम
रात्री ११ पासून पहाटे ४ पर्यंत राबविलेल्या मोहीमेत उचलला ६० टन कचरा
लातूर /प्रतिनिधी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेलेल्या दिसतात. त्यामुळे कच-याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे दिवाळीच्या कालावधीत वेगवेगळया प्रकारचे फटाके वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात लक्षणीय भर पडलेली आढळून येते.
या अनुषंगाने स्वच्छ शहर म्हणून रहावे म्हणून आग्रही असलेले आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या आदेशानूसार तसेच उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखालील लातूर शहर महानगरपालिका स्वच्छता विभागामार्फत दिपावली सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्यात आलेले आहे.
या विशेष स्वच्छता मोहीमेमध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता विभागातील २५० कर्मचारी तसेच कंत्राटदार अशोक एंटरप्रायसेस यांचे सर्व कर्मचारी यांचेद्वारा २० ट्रॅक्टर, ४ हायवा, ४ जेसीबी च्या साह्याने ८० ट्रिप ट्रॅक्टर, ६ हायवा ट्रिप द्वारे ६० टन कचरा उचलून वाहतूक करण्यात आला. सदर मोहिमेमध्ये कलीम शेख मुख्य स्वच्छता अधिकारी,रमाकांत पिडगे स्वच्छता विभाग प्रमुख, रवी कांबळे मुख्य स्वच्छता निरीक्षक, डि.एस. सोनवणे मुख्य स्वच्छता निरीक्षक,शिवराज शिंदे मुख्य स्वच्छता निरीक्षक, अक्रम शेख मुख्य स्वच्छता निरीक्षक तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थिीत होते.
सदर मोहिमेमुळे लातूर शहर सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मॉर्निग वॉक करणा-या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली. महत्वाचे म्हणजे मध्यरात्री व पहाटे ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असली तरी दररोज सकाळी होणारी साफसफाई नियमीतपणे सुरु असल्याने समाधानकारक अभिप्राय व्यक्त करण्यात आले.–

