माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत
मळवटी, लातूर येथील ट्वेंटीवन शुगरच्या ५ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन
लातूर प्रतिनिधी, गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५:
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव
देशमुख आणि ट्वेंटीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या
प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी लातूर तालुक्यातील मळवटी येथील
ट्वेंटीवन शुगरच्या ५ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अवीर अमित देशमुख
यांच्या हस्ते विधिवत बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या
हस्ते कारखाना स्थळी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, अत्यंत
अद्यावत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ट्वेंटीवन शुगर्सने आता ऊस
तोडणीतही यांत्रिकीकरण आणले आहे, यातून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगारही उपलब्ध झाला
आहे. कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिकचा मोबदला
मिळावा असा प्रयत्न सुरू आहे असे सांगीतले.
पूढे बोलतांना ते म्हणाले, मागच्या गळीत हंगामातील गाळप ऊसाला ट्वेंटीवन शुगर्सने
अंतीम ऊसदर प्रतिटन ३००१ रुपये एवढा विक्रमी भाव दिला आहे. लवकरच सुरुवात होत
असलेल्या आगामी गळीत हंगामात मांजरा परिवाराने जाहीर केलेल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांच्या
ऊसाला प्रतिटन ३१५१ रुपये भाव देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांना जिद्दीने
प्रयत्न करावयाचे आहेत. यातून परिसरातील शेतकरी, शेतमजूर कामगार या सर्वांच्या जीवनात
समृद्धी, स्थैर्य आणि आनंद निर्माण होईल हा विश्वास आहे.
या सोहळ्यास ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, जनरल मॅनेजर संतोष
बिरादार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह
बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ऋषिकेश पाटील, राजकुमार पाटील, बळवंत पाटील, शंकर
बोळंगे आदींसह सर्व खातेप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांजरा परिवाराप्रमाणे ट्वेंटीवन शुगर्स लि., गाळप झालेल्या सभासद व ऊस उत्पादक
शेतकऱ्यांच्या उसाला गळीत हंगाम सन २४-२५ करीता विक्रमी ऊसदर देत आहे. मागील गळीत
हंगामात ट्वेंटीवन शुगर्सकडून गाळप झालेल्या उसाला ३००१/- रु. प्रति टन प्रमाणे ऊस दर
देण्यात आलेला आहे. गळीत हंगाम २४-२५ मध्ये गाळप झालेल्या या ऊसाची अंतिम राहिलेली
ऊस बिलाची रक्कम कारखानाकडून दिवाळी पाडवाच्या शुभमुहूर्तावर गटनिहाय ऊस उत्पादकांच्या
खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली.
मांजरा परीवाराप्रमाणे येणाऱ्या हंगामातही गाळप झालेल्या ऊसाला ऊसदर अदा करण्यात
येणार आहे. त्यामुळे जास्तीत सभासद व ऊसउत्पादकांनी आपला ऊस येणाऱ्या गळीत हंगामात
ट्वेंटीवन शुगर्स लि.,ला गाळपास दयावा असे आवाहन करण्यात आले आहे.

