लातूर शहरात विदयार्थ्यांमार्फत एक लाख वीस हजार वृक्ष लागवड होणार
लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकाराने “एक विदयार्थी- एक वृक्ष” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग व वन विभाग लातूर यांच्यामार्फत मोफत वृक्ष वाटप करण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून लातूर शहरातील एकुण ३५० शाळेमधील प्रत्येक विदयार्थ्यांना एक वृक्ष असे जवळपास १,२०,००० (अक्षरी एक लाख वीस हजार ) वृक्ष वाटप करण्यात येत आहेत. दि. ०९/१०/२०२५ रोजी लातूर शहरातील श्री श्री रविशंकर विदयामंदीर या शाळेमध्ये मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या हस्ते विदयार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी लातूर शहरामध्ये वृक्ष लावणे किती महत्वाचे आहे याबाबत त्यांनी विदयार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच विदयार्थ्यांनी लावलेल्या झाडाची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी असे आवाहन केले.यावेळी “एक विदयार्थी- एक वृक्ष” या उपक्रमाचे प्रणेते ए. एस नाथन यांनी विदयार्थ्यांना भावनिक मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी माणुस व वृक्ष यांचे नाते याबाबत स्पष्ट करून सांगितले. माणसाच्या वंशाला वृक्ष त्याची दुसरी आई म्हणून जन्म देतो परंतु माणुस वृक्षाचा वंशच होऊ देत नाही त्यांना कापून नष्ट करत आहे, उपटून टाकत आहे, तसेच जाळून टाकत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास लातूर मनपातील वाहन विभाग प्रमुख पवन सुरवसे, वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक (ऑक्सीजन मॅन) ए एस नाथन, मुख्याध्यापिका सोनाली कुलकर्णी (मराठी माध्यम), मुख्याध्यापिका विनया मराठे (इंग्रजी माध्यम),शिक्षण विस्तार अधिकारी धनराज गित्ते, नोडल प्रमुख तुकाराम पवार व शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. लातूर शहर हरीत करण्यासाठी मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू आहे.
