लातूर शहर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शितल मालू यांची नियुक्ती
लातूर : भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. शितल विनोद मालू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी भाजपा वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने ही नियुक्ती केली आहे.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी नुकतीच शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे. त्यामध्ये महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी धडाडीच्या महिला नेत्या सौ. शितल विनोद मालू यांच्यावर सोपवली आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणूनही त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. आपल्या प्रभागातील समस्यांची सोडवणूक करण्याकामी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासही त्या मागेपुढे पाहत नाहीत, याची प्रचिती त्यांच्या प्रभागातील मतदारांनी अनेकदा घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी या नियुक्तीनंतर बोलताना दिली. लातूर शहरातील समस्यांची जाण असलेल्या आणि त्या समस्यांची सोडवणूक कशी करायची याचा त्यांना चांगला अभ्यास असल्याने पक्षाने एका धडाडीच्या आणि संघर्षशील महिला नेतृत्वाला योग्य संधी दिल्याबद्दल अनेकांनी त्यांच्या या नियुक्तीचे स्वागत केले आहे. शितल मालू यांनीही आपली ही नियुक्ती आपल्या कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवून आपण पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे, तो विश्वास आगामी मनपा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण नेत्यांच्या आदेशाप्रमाणे काम करू अशी भावना बोलून दाखविली आहे.
