निरोप देते वेळी विद्यार्थी गावकरी व शिक्षक झाले भावूक
निलंगा (प्रतिनिधी):- तालुक्यातील जेवरी शाळेतून नुकतीच बदली झालेले प्राथमिक पदवीधर जाधव एम एम व कलशेट्टी पी एस यांना शाळेच्या, गावच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक , शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी,व गावकरीही भावूक झाले अनेकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. या भावपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच शिवराज सूर्यवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक तांबोळे एस एस, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुरवसे व महाराष्ट्र विद्यालयचे मुख्याध्यापक नागेश तुबाकले उपस्थित होते. फुलांची उधळण करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या वतीने प्रथम मुख्याध्यापक राठोडे ए एस व सहकाऱ्याच्या वतीने जाधव एम एम व कलशेट्टी पी एस यांचा बदली झाल्यामुळे शाल श्रीफळ व पुष्पहार आणि भेट वस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व शाळेत रुजू झाल्यामुळे शिंदे एस ए.व बाबळसुरे डी डी यांचाही सत्कार करण्यात आला. गावच्या वतीने सरपंच शिवराज सूर्यवंशी व ग्रामपंचायत सदस्य अयोध्या शिंदे यांनी मानाचा फेटा बांधून सत्कार केला.तसेच महाराष्ट्र विद्यालयाच्या वतीने नागेश तुबाकले व बाळू सावरे यांनी सत्कार करून निरोप दिला.तसेच पालक प्रतिनिधी लक्ष्मण इंगळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, अंगणवाडी ताई, विद्यार्थी यांनीही भावपूर्ण सत्कार करून निरोप दिला .कार्यक्रमाचे छान प्रास्ताविक श्रीमती सुनीता शेरीकर यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अर्णव गोमसाळे, ढगे समर्थ यांनी आठवणीना उजाळा दिला. विद्यार्थिनी प्रतिनिधी मधून प्राची सुरवसे, अनुष्का शिंदे, सरोजा शिंदे व इतर मुलीनी भावना व्यक्त केल्या यामुळे वातावरण भावनिक तयार झाले. शिक्षिका भगिनी श्रीमती सविता शेरीकर यांनी तर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. तांबोळे एस एस यांनी आठवणी जागृत केल्या.तर लक्ष्मण सुरवसे यांनी अनुभव कथन केले.सत्काराला उत्तर देताना जाधव एम एम, कलशेट्टी पी एस यांचा कंठ दाटून आला होता. पालक, शिक्षक यांनीही भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन राठोडे ए एस यांनी केले तर आभार बाबळसूरे डी डी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे एस ए पडलवार व्हि पी, शितल तारे, दत्तात्रय शिंदे, नारायण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले . यावेळी माजी विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती.
