खते, कीटकनाशकांवरील जीएसटी त्वरित शून्य करा- संतोष सोमवंशी
पंतप्रधानांकडे राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांची मागणी
लातूर : केंद्र सरकारने जीएसटी दराच्या रचनेत बदल केला. कृषीशी संबंधित उपकरणांच्या जीएसटी दरात कपात केली. परंतु, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी खते आणि कीटकनाशकांवरील जीएसटी शून्य करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २२ सप्टेंबर रोजी जीएसटी दरात कपात केली.
जीएसटी दराच्या रचनेत केलेल्या बदलानुसार ट्रॅक्टर, ट्रेलर, टायर्स आणि इतर कृषी उपकरणांवर दरकपात केली आहे. परंतु, ही उपकरणे आणि कृषी वाहनांच्या खरेदीचा सरळ लाभ देशातील केवळ पाच टक्के शेतकऱ्यांपर्यंतच मर्यादित आहे. जे शेतकरी यांत्रिकीकरणाचा उपयोग करतात त्यांनाच हा लाभ मिळू शकतो. परंतु, देशातील ६० कोटी शेतकरी लहान घटकातील आहेत. तत्काळ आणि सरळ लाभमिळावा, यादृष्टीने खते व कीटकनाशके आदी अँग्रीकल्चर इनपुटवर जीएसटी दर शून्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.खतावर जीएसटीचा सध्याचा दर 5% कीटकनाशके सध्याचा दर १८% आहे कृषीसाठी लागणारी खते आणि कीटकनाशके तसेच इतरखर्चावर लागणारा जीएसटी शून्य केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल. या निर्णयाचा देशातील ६० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल. शेतकऱ्याऱ्यांना सशक्त बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. खते आणि कीटकनाशकांवरील जीएसटी शून्य केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी पंतप्रधानांना केली आहे
