माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
रामगिरी नगरातील अतिवृष्टीग्रस्तांना गृहउपयोगी किटचे वाटप
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी केली
लातूर प्रतिनिधी, बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५:
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी लातूर शहरागत असलेल्या रामगिरी नगरमध्ये जाऊन तेथे अतिवृष्टीमुळे
निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी केली. वासनगाव ग्रामपंचायत अंतर्गत पुरवल्या
जाणाऱ्या नागरी सुविधांची माहिती घेतली, नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी
समजून घेतल्या, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करावेत, या परिसरात आवश्यक
त्या सोयी सुविधा तातडीने पुरवाव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या
आहेत.
यावेळी इंडियन असोसिएशन ऑफ गायनॉलॉजिकल एन्डोस्कॉपीच्या (IAGE) वतीने
लातूर शहरानजीकच्या रामगिरी नगरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना गृहउपयोगी वस्तूंच्या
किटचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी रामगिरी नगरातील नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले ते म्हणाले की,
वासनगावचे २८० लोक येथे राहतात, मात्र त्यांची नोंद ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत
नाही. रामगिरी नगरचे प्रकरण छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात रेंगाळले आहे, याची
नोंद घेऊन आमदार देशमुख म्हणाले की, महसूल विभाग आणि नगररचनाकार विभाग या
प्रकरणाची अधिक माहिती घेतील. येथील नागरिकांनी त्यांच्याकडील रहिवाशी पुरावे
शासनाकडे सादर करावेत. न्यायालयाच्या नियमानुसार येथे रस्ता, नाली आणि मूलभूत
सोयीसुविधा करता येत असतील, तर त्या आम्ही नक्कीच करू, असे सांगून त्यांनी
नागरिकांना दिलासा दिला. तसेच, त्यांनी सर्वांना दसरा-दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी
आमदार देशमुख यांनी रामगिरी नगर येथील जगदंबा नवरात्र मंडळाच्या जगदंबा मातेचे
दर्शन घेतले आणि येथील कच्च्या रस्त्याची पाहणीही केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक IAGE चे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे यांनी केले. यावेळी
तहसीलदार सौदगार तांदळे, नायब तहसीलदार गणेश सरवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
कमिटीचे सचिव ॲड. समद पटेल, मनपा सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तापडे, इंडियन
असोसिएशन गायनॉलॉजिकल एन्डोस्कॉपीचे अध्यक्ष डॉ.कल्याण बरमदे, लातूर शहर
महानगरपालिकेच्या शहर अभियंता उषा काकडे, कनिष्ठ अभियंता वैभव स्वामी, स्वच्छता
विभागप्रमुख कलीम शेख, झोनल ऑफिसर संतोष लाडलापुरे, डॉ.अजय जाधव,डॉ. मनीषा
बरमदे, डॉ.शरयू पाटील, वासनगावचे सरपंच रमेश थोरमोठे पाटील, फारुक शेख,
ग्रामपंचायत अधिकारी शंकर बसरगे, तलाठी गणेश भारती, रघुनाथ मस्के, फकीर कांबळे,शिवाजी येडके, निलेश मस्के, स्मिताबाई कांबळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध
पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
