डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख ११ हजार १११ सुपूर्द

लातूर : डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालय, अहमदपूर जि . लातूरच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘ ओले रंग’ या चित्र प्रदर्शनातून १ लाख ११ हजार १११ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केली. डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ ओले रंग’ चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या चित्र प्रदर्शनास अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आलेल्या १ लाख ११ हजार १११ रुपयांच्या रकमेचा धनादेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादव यांनी विद्यार्थ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत ‘ वर्षा ‘ या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या या कृतीने अक्षरशः भारावून गेले. आपदग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांनी केलेली कृती प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचे संस्थापक निवृत्ती यादव यांनी यावेळी आपल्या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. संस्थेच्या वतीने आतापर्यंत वेळोवेळी नैसर्गिक आणि राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी संस्थेच्या वतीने सर्वतोपरी आर्थिक सहायता करण्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले भावूक
राज्यातील आपदग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहाय्यता करण्याचे आवाहन केले जाते आणि त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो, ही बाब खरी असली तरी अहमदपूरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून निधी संकलित केल्याचे पाहून आपणास अतिशय समाधान वाटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शासनाने आवाहन केले आहे म्हणून नव्हे तर पुरग्रस्तांच्या व्यथा पाहून आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, मदतीसाठी खारीचा उचलला पाहिजे या भावनेने विद्यार्थ्यांनी उचलेले हे मदतीचे पाऊल राज्यात प्रत्येक व्यक्तीला सामाजिक जाणिवा जागृत करुन चालण्याची शिकवण देणारे आहे. या विद्यालयातील पाचवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. स्वरा दीपक नराळे हिने रेखाटलेल्या ‘ हरवलेलं सारं काही पुन्हा उभारुया एकजुटीने पुढे जाऊ या.. ‘ मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा..’ या चित्रावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वाक्षरी करून आपल्या महाराष्ट्र राज्याला एवढ्या उदात्त दृष्टीकोनाने चालणारे भावी नागरिक मिळणार असल्याचे पाहून आपले मन भरून आल्याचे बोलून दाखविले . या विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यापुढे मदत – सहकार्याचा एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.