अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी जे.एस.पी.एम., लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने ५ लाखांचा निधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
लातूर प्रतिनिधी- लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे पुर परिस्थितीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महायुती सरकारच्या वतीने नुकसानग्रस्तांना मदत प्राप्त होणारच आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जे.एस.पी.एम., लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने याही वेळी पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी निभावलेली आहे. माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी ५ लाखांचा निधी जाहीर करण्यात आलेला असून या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.
गत महिनाभरापासून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून त्यांच्यावर आभाळ फाटल्यासारखे संकट ओढावलेले आहे. या संकटात त्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. महायुती सरकारच्या वतीने नुकसानग्रस्तांना मदत प्राप्त होणार आहे. मात्र नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारे कव्हेकर कुटुंब याही वेळी अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी धावून आलेले आहे. अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी जे.एस.पी.एम. लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे.
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी यासाठी पुढाकार घेतलेला असून सदर रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या दोघांनी सुपूर्द केला आहे. यावेळी माजी आ. कव्हेकर यांनी अतिवृष्टी झाल्यामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. तसेच या परिस्थितीत सरकारच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना अधिकाधिक मदत प्राप्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या माध्यमातून राज्यातील जनतेच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर येथील जिल्हा रुग्णालयासह कव्हा येथील विभागीय क्रिडा संकुलाचे भुमीपुजन सोहळ्यासाठी आपण यावे अशी विनंती करून त्याकरिता निमंत्रित केले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात आयुर्वेदास प्राध्यान्य देण्यात येत असून याकरिता लातूर येथे जिल्हास्तरीय आयुष रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.
