• Wed. Oct 15th, 2025

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी बांधिल -माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

Byjantaadmin

Oct 1, 2025

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी बांधिल -माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची पत्रपरिषदेत माहिती

लातूर ;- लातूर जिल्ह्यात यावर्षी विक्रमी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम हातातून गेलेला असून शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. पशुधन दगावल्याच्या घटना घडलेल्या असून जिल्ह्यात घरांचीही पडझड झालेली पाहण्यास मिळत आहे. विशेषत: या अतिवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून शेतकºयांना सरकारकडून समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी आपण बांधिल असून यासाठी शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरु असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ. संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंके, जि. प.चे माजी बांधकाम सभापती संजय दोरवे, बाजार समितीचे सभापती नरसिंग बिराजदार, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, मंगेश पाटील, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिमे आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

लातूरला यापूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आलेला होता. याची आठवण करून देत आ. निलंगेकर म्हणाले की, दुष्काळ अनुभवलेल्या लातूर जिल्ह्याला आता जलमय परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून गेल्या दीड महिन्यात अतिवृष्टीला सामोरे जावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम हातातून गेलेला असून जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीनचे पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तसेच खरिपाची इतर पिकेही हाती लागण्याची कोणतीही शक्यता नाही. अतिवृष्टीमुळे जिवीतहानी कमी प्रमाणात झालेली असून पशुधनही दगावले गेले आहेत. पूरपरिस्थिमुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आपण पोहोचविला असल्याची माहिती आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यासह नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारे पंचनामे १०० टक्के करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेले असून पंचनाम्याबाबत कोणाची काही तक्रार असेल तर त्याची दखल घेवून नुकसान झालेल्या प्रत्येकाचे पंचनामे होतीलच अशी ग्वाही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली. अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मदत मिळालेली असून सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी शासन व प्रशासन यांच्याशी संपर्क साधून आवश्यक तो पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना समाधानकारक म्हणजेच हेक्टरी ५० हजार रुपये मदत कशी मिळेल, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असून शेतकºयांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी आपण बांधिल असल्याची ग्वाही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली.

अतिवृष्टीचे नुकसान ही नैसर्गिक आपत्ती असून या आपत्तीत जिल्ह्यातील शेतकºयांसह नागरिकांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने खंबीरपणे उभे रहावे, अशी अपेक्षा आ. निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर शेतकºयांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर एकत्रित येवून शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा. तसेच गरज पडल्यास आंदोलन करण्याची वेळ आली तरी सर्वांनी यामध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यावे, असे आवाहन आ. निलंगेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *