भारतीय टपाल विभागाची परदेशी पार्सल सेवा सुलभ, सुरक्षित आणि किफायतशीर
लातूर, दि. ०१ : भारतीय टपाल विभागाने नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात परदेशी पार्सल सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे फराळ, भेटवस्तू, दस्तऐवज किंवा महत्वाचे सामान घरबसल्या परदेशात पाठवता येईल. ही सेवा लहान ते मोठ्या आकाराच्या पार्सल्ससाठी उपलब्ध आहे.
सर्व वर्गातील नागरिकांसाठी परवडणारे दर, पार्सल पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने पाठविण्याची सुविधा, नियोजित वेळेत गंतव्य स्थळी पोहोच, सुलभ प्रक्रिया, जवळच्या टपाल कार्यालयातून सहज सेवा, पार्सलची स्थिती ऑनलाइन तपासण्याची सोय ही या सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
जवळच्या टपाल कार्यालयात पार्सल जमा करतेवेळी त्याचे वजन आणि गंतव्य स्थानानुसार दर निश्चित करण्यात येतील. त्यानुसार ग्राहकाला रसीद आणि ट्रॅकिंग आयडी मिळेल. पार्सल सुरक्षितपणे परदेशात पोहोचवले जाईल. या सुविधेमुळे सणासुदीत भेटवस्तू पाठवणे सोपे झाले आहे. तसेच व्यावसायिक आणि औपचारिक दस्तऐवजांसाठी विश्वासार्ह सेवा उपलब्ध झाली आहे. या सेवेच्या अधिक माहितीसाठी लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी श्री. मोहन सोनटक्के (मो. 9834958317) यांच्याशी संपर्क साधावा किंवा जवळच्या टपाल कार्यालयात भेट द्यावी. ऑनलाइन माहितीसाठी www.indiapost.gov.in ला भेट द्या, असे आवाहन धाराशिव डाक विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
