नागरिकांनी शासकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत- डॉ. दिनकर पाटील
निलंगा(प्रतिनिधी) :- नागरिकांनी आजार उद्भवल्यास तो आजार लपवून किंवा आजाराकडे दुर्लक्ष करून घरी बसून आपले आरोग्य धोक्यात घालू नका महाराष्ट्र सरकारकडून सर्व सुविधांनी सुसज्ज असे सरकारी दवाखाने निर्माण करण्यात आले असून निलंगा येथीलही उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध असून सर्व आजारावर मोफत उपचार देण्यात येतात.
यासाठी येथे अनेक तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.येथे तज्ञ डॉक्टरांचा संच सेवेमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिवारात अथवा आपल्या मित्र परिवारातील कोणीही आजारी असल्यास घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात दाखल करावे व आपला आजार बरा करून सुखी जीवन जगावे असे आवाहनही डॉ. दिनकर पाटील यांनी केले.ते निलंगा उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमास डॉ.पिसाळ, गोविंद सु्र्यवंशी, पत्रकार मिलिंद कांबळे, कोकाटे सिस्टर, मोनिका पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटील पुढे म्हणाले की, 30 तीस वर्षाच्या पुढील नागरिकांनी आपल्या शरीराच्या सर्व तपासण्या करून घेऊन उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करून चांगले जीवन जगावे असे आवाहनही डॉक्टर पाटील यांनी यावेळी केले या कार्यक्रमास निलंगा शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिक व उपचार कामी आलेले महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
